विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:58 IST2018-02-25T00:58:02+5:302018-02-25T00:58:06+5:30
जालना-मंठा मार्गालगत डुकरीपिंपरी शिवारात एका विहिरीत गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह शनिवारी दुपारी आढळून आला.

विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
विरेगाव : जालना-मंठा मार्गालगत डुकरीपिंपरी शिवारात एका विहिरीत गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह शनिवारी दुपारी आढळून आला. बंडू उर्फ नन्नू मुरलीधर शिंदे (३५,रा. हडपसावरगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतदेह पूर्णपणे कुजल्यामुळे ही आत्महत्या की घातपात, असा संशय स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे.
परिसरात दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता, एका कोरड्या विहिरीत लिंबाच्या झाडाला दोर बांधून एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत नागरिकांनी मौजपुरी पोलिसांना माहिती दिली. सपोनि मनिष पाटील हे घटनास्थळी पोहचले. पंचनामा करताना मृत व्यक्तीच्या खिशात सीमकार्ड आढळून आले. पोलिसांनी हे सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकून परिसरातील काही व्यक्तींच्या क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा हा क्रमांक बंडू शिंदे यांचा असल्याची माहिती मिळाली. शिंदे यांच्या पाठीवर खरचटलेले असून, शरिरावर जखमा आहेत.
मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने तीन-चार दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मौजपुरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.