संशयाने संपवला संसार ! कुऱ्हाडीने वार करून आधी पत्नीस केले ठार नंतर घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 18:00 IST2021-03-30T18:00:00+5:302021-03-30T18:00:28+5:30
बाजीराव लहाने यांनी अनेकवेळा मैनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली होती.

संशयाने संपवला संसार ! कुऱ्हाडीने वार करून आधी पत्नीस केले ठार नंतर घेतले विष
मानदेऊळगाव - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस ठार केले, त्यानंतर विष प्राशन करून पतीने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील वंजार उमरद येथे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मैनाबाई बाजीराव लहाने (४८) व बाजीराव दामाजी लहाने (५२) अशी मयतांची नावे आहेत.
मैनाबाई लहाने व बाजीराव लहाने हे दोघे मुलगा व सुने सोबत वंजार उमरद येथील शेतात राहतात. बाजीराव लहाने यांनी अनेकवेळा मैनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली होती. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुलगा किराणा सामान आणण्यासाठी गावात गेला होता. हीच संधी साधत बाजीराव लहाने यांनी मैनाबाई यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले. हे विदारक चित्र पाहताच सून बेशुध्द झाली. त्यानंतर विष प्राशन करून बाजीराव लहाने यांनी आत्महत्या केली.
मुलगा परत आल्यावर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत आई दिसली. तर वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोनि. देविदास शेळके, सपोनि. संभाजी वडते यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यापुढील तपास सपोनि. संभाजी वडते हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा सैनिक आहे तर एक मुलगी ग्रामविकास अधिकारी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.