पत्नीने केला पतीचा खून; लोखंडी वस्तूने डोक्यात वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 14:01 IST2019-06-24T13:59:56+5:302019-06-24T14:01:07+5:30

संपत्तीच्या वादातून खून झाल्याचा पोलिसांना संशय

wife kills husband in jalna | पत्नीने केला पतीचा खून; लोखंडी वस्तूने डोक्यात वार

पत्नीने केला पतीचा खून; लोखंडी वस्तूने डोक्यात वार

अंकुशनगर (जालना) : एका महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळ (जि.जालना) येथे घडली. ही सोमवारी पहाटेच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक जिजा मुळे (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

महाकाळ येथील माणिक जिजा मुळे यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी सत्यभामा या माहेरी गेल्या होत्या. तर माणिक मुळे व त्यांची दुसरी पत्नी शारदा हे दोघे रविवारी रात्री घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास पतीला कोणीतरी माणसे मारत असल्याचे सांगत शारदा मुळे या गावचे पोलीस पाटील राजेंद्र कव्हाळे यांच्याकडे धावत गेल्या. कव्हाळे व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता माणिक मुळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. 

घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचरण करण्यात आले. मात्र, माग काढण्यासाठी श्वानाला कोणतीही वस्तू आढळली नाही. घराचे दरवाजे, कड्या तुटलेले आढळून न आल्याने हा बनाव असल्याचा संशय घेत पोलिसांनी शारदा मुळे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच शारदा मुळे यांनी आपण पतीच्या डोक्यात अवजड वस्तूने वार करून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मयताची पहिली पत्नी सत्यभामा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शारदा मुळे यांच्याविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि हनुमंत वारे हे करीत आहेत.

संपत्तीच्या वादातून केले कृत्य
महाकाळा येथील माणिक जिजा मुळे यांना गावच्या शिवारात १२ एकर शेती आहे. लग्नानंतर त्यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पहिल्या लग्नाच्या पंधरा वर्षानंतर दुसरे लग्न केले. मात्र, तरीही त्यांना मूलबाळ झाले नाही. दोन लग्नानंतरही मूलबाळ होत नसल्याने एखादे मूल दत्तक घेण्याची चर्चा माणिक मुळे करत होते. त्यामुळे संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: wife kills husband in jalna

टॅग्स :Murderखून