फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:52+5:302021-09-04T04:35:52+5:30
जालना : गत महिन्यात २५ रुपयांनी वाढलेला गॅसचा दर चालू महिन्यातही २५ रुपयांनीच वाढला आहे. प्रत्येक महिन्याला गॅसचे दर ...

फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !
जालना : गत महिन्यात २५ रुपयांनी वाढलेला गॅसचा दर चालू महिन्यातही २५ रुपयांनीच वाढला आहे. प्रत्येक महिन्याला गॅसचे दर वाढू लागल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या का, असा संतप्त सवाल महिला उपस्थित करीत आहेत.
पेट्रोल, डिझेलसह खाद्य तेलांमध्ये झालेली वाढ ही सर्वसामान्यांसह गृहिणींसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. त्यात चालू वर्षात गॅसच्या किमतीत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. केवळ एप्रिल महिन्यात दहा रुपयांनी गॅसचे दर कमी झाले होते. तर मे - जूनमध्ये एप्रिलचे दर कायम पाहिले होते. परंतु, जुलै महिन्यापासून या दरात प्रत्येक महिन्याला २५ रुपयांनी वाढ होऊ लागली आहे. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन ग्राहकांना दिली आहेत. परंतु, वाढणारे गॅसचे दर पाहता गॅस वापरायचा की नाही, असाच प्रश्न जिल्ह्यातील अनेक महिलांसमोर निर्माण होताना दिसत आहे.
सबसिडी किती भेटते हो भाऊ
गॅस पूर्ण रकमेत खरेदी केल्यानंतर शासनाकडून ग्राहकांना यापूर्वी काही प्रमाणात सबसिडी दिली जात होती.
प्रारंभी मिळणारी सबसिडी आता कमी झाली आहे. कोणाला दहा - वीस, तर कोणाला चार - पाच रुपयांपर्यंत सबसिडी मिळत आहे.
कमी होणारी सबसिडी पाहता ही सबसिडी पूर्ण बंद होणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
व्यावसायिक सिलिंडरही महाग
हॉटेल व्यावसायिक वापरत असलेल्या गॅसच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मागील महिन्यात १,६६६ रुपयांवर असलेला हा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १,७३६ रुपयांवर गेला आहे. यातही तब्बल ७० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे व्यवसाय करायचा कसा, असाच प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा आहे.
महिन्याचे गणित कोलमडले
गॅस येण्यापूर्वी चुलीवर स्वयंपाक व्हायचा. गॅसमुळे आम्हाला दिलासा मिळाला होता. परंतु, वाढणारे गॅसचे दर पाहता आता गॅस वापरायचा की नाही, असा प्रश्न पडत आहे.- सविता बगडिया
गत काही वर्षापर्यंत गॅसचे दर कमी होते. परंतु, आता दर गगनाला भिडले आहेत. मिळणारी सबसिडीही मिळत नाही. त्यामुळे आमचे मासिक गणित पूर्णत: कोलमडत आहे.- रोहिणी सोळंके
गॅसचे दर वाढल्याने आर्थिक गणित जुळविताना कसरत करावी लागते. शहरातील प्लॉटमध्ये चुलीही पेटविता येत नाहीत. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती पाहता दर कमी करावेत.- ज्योती साळवे