तुम्ही महसूलच्या मदतीला का आले, असे म्हणत वाळूमाफियांची पोलिसांना धमकी

By दिपक ढोले  | Published: June 3, 2023 07:15 PM2023-06-03T19:15:39+5:302023-06-03T19:15:48+5:30

शनिवारी भोकरदन तालुक्यातील जुई धरण पाटीजवळ घडली घटना

Why did you come to help the revenue, the sand mafia threatened the police | तुम्ही महसूलच्या मदतीला का आले, असे म्हणत वाळूमाफियांची पोलिसांना धमकी

तुम्ही महसूलच्या मदतीला का आले, असे म्हणत वाळूमाफियांची पोलिसांना धमकी

googlenewsNext

जालना : तुम्ही महसूल विभागाच्या मदतीला का आले, तुम्ही नोकरी कशी करता बघून घेतो, असे म्हणत भोकरदन पोलिसांना वाळूमाफियांनी धमक्या दिल्याची घटना शनिवारी भोकरदन तालुक्यातील जुई धरण पाटीजवळ घडली. वाळूमाफियांच्या मुजोरीपुढे महसूल व पोलिस यंत्रणा हतबल झाली आहे. केवळ संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ जून रोजी पाच वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी जुई धरण पाटीजवळ अवैध वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा हायवा पकडला होता. भोकरदन पोलिस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड यांना फोन करून पोलिस कर्मचारी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तोपर्यंत वाळूमाफियांचे टोळके तेथे जमा झाले. त्यांनी हायवा सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना चांगलेच खडसावले. त्याचवेळी पोलिस कर्मचारी आले. महसूल विभागाने पंचनामा करून हायवात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बसविले. हायवा पोलिस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले.

याचदरम्यान संशयित शेख शहेजाद शेख युसूफ (रा. भोकरदन) व रामचंद्र तळेकर (रा. भोकरदन) यांनी पोलिस कर्मचारी अनिल गवळी, सतवण यांना तुम्ही महसूल विभागाच्या मदतीला का आले, तुम्ही नोकरी कशी करता बघून घेतो, असे म्हणत हायवातील वाळू खाली करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी जीव मुठीत धरून हा हायवा भोकरदन पोलिस ठाण्यात आणला. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे हेसुद्धा ठाण्यात आले. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तक्रार पोलिसांनी द्यावी की महसूल विभागाने द्यावी यावर एकमत झाले नाही. त्यामुळे उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. शेवटी पोलिस कर्मचारी अनिल गवळी यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. यामध्ये कोठे तरी पाणी मुरल्याची चर्चा सुरू झाली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बजरंग कोठुबरे हे करीत आहेत.

Web Title: Why did you come to help the revenue, the sand mafia threatened the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.