जिल्ह्यातील २९ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:44+5:302021-09-03T04:30:44+5:30
यंदा जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली तरी बहुतांश प्रकल्पांची तहान कायम होती. पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपातील पिकेही धोक्यात आली होती. ...

जिल्ह्यातील २९ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर
यंदा जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली तरी बहुतांश प्रकल्पांची तहान कायम होती. पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपातील पिकेही धोक्यात आली होती. शिवाय, मोठा पाऊस नसल्याने शहरी, ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाले दुथडी वाहिली असून, मागील आठवड्यात जिल्ह्यातील ६४ प्रकल्पात ४१ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा ५९ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांमध्ये ५८.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. २९ प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तीन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा झाला आहे. १४ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर १२ प्रकल्पांमध्ये शून्य ते २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या केवळ सहा प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पडणारा पाऊस आणि प्रकल्पात होणारी पाण्याची आवक पाहता लवकरच जिल्ह्यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिकांचे अतोनात नुकसान
गत दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश खरिपातील पिकांमध्ये पाणी उभे राहिले आहे. या पावसात उभा ऊस आडवा झाला असून, फळपिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तालुका मध्यम प्रकल्प उपयुक्त पाणी
जालना कल्याण गिरजा १०० टक्के
जालना कल्याण मध्यम ४६.२४ टक्के
बदनापूर अप्पर दुधना ३०.१७ टक्के
भोकरदन जुई मध्यम ३०.०२ टक्के
भोकरदन धामणा मध्यम ३२.३१ टक्के
जाफराबाद जीवरेखा मध्यम ९.४६ टक्के
अंबड गाल्हाटी मध्यम ९८.७० टक्के
कॅप्शन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई प्रकल्पात झालेला पाणीसाठा.