ग्रामस्थांचा दाढी-कटिंगवर बहिष्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:45 IST2018-03-26T00:45:09+5:302018-03-26T00:45:09+5:30
जळगाव सपकाळ येथे नाभिक समाजाने दाढी-कटींगचे दर वाढवले. हे दर कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली. मात्र, नाभिक समाजाने दर कमी न करण्याचा निर्णय घेतल्याने गावक-यांनी ग्रामसभा घेऊन गावात दाढी-कटिंग करण्यावर बहिष्कार टाकण्याचा आगळा वेगळा ठराव घेतला

ग्रामस्थांचा दाढी-कटिंगवर बहिष्कार !
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे नाभिक समाजाने दाढी-कटींगचे दर वाढवले. हे दर कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली. मात्र, नाभिक समाजाने दर कमी न करण्याचा निर्णय घेतल्याने गावक-यांनी ग्रामसभा घेऊन गावात दाढी-कटिंग करण्यावर बहिष्कार टाकण्याचा आगळा वेगळा ठराव घेतला.
जळगाव-सपकाळ येथे नाभिक समाजाची ग्रामपंचायतच्या जागेवर सलूनची नऊ दुकाने आहेत. सलून चालकांनी पूर्वी दहा व पंधरा रुपये असलेले दाढी-कटींगचे दर वाढवून पंधरा व तीस रुपये केले. दर कमी करण्यासाठी ग्रामस्थांनी दोन वेळेस ग्रामसभा घेऊन सलून चालकांना दर कमी विनंती केली. मात्र, वाढत्या महागाईमुळे दर कमी करू शकत नाही, असा पवित्रा सलून चालकांनी घेतला. त्यामुळे गावक-यांनी दर कमी न करणा-यांकडे गावातील सलून चालकांकडे दाढी-कटींग न करण्याचा निर्णय घेतला. नाभिक समाजाने ग्रामपंचायतीच्या जागेवर दुकाने थाटली आहेत. त्यासाठी कुठेही भाडे व विजेचे बिल आकारले जात नाही. त्यामुळे दर कमी ठेवावेत, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे सरपंच मधुकर सपकाळ यांनी सांगितले. नाभिक समालातील दोघांनी ग्रामपंचायतने जागा दिल्यास कमी दरात दाढी-कटींग करण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे त्यांना दोन दुकाने सुरू करून दिल्याचे सरपंच म्हणाले. तर नाभिक संघटनेने राज्यभरात नवीन दराने दाढी-कटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर वाढविल्याचे सलून चालक गणेश वरपे यांनी सांगितले.