मंठा : माजी आमदार धोंडिराम राठोड यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राठोड यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. रविवारी रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले, तसेच गरजूंना ब्लँकेटचे वाटप करून रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना भोजन देण्यात आले. सायंकाळी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनीदेखील कार्यक्रमाला हजेरी लाऊन धोंडिराम राठोड यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी धोंडिराम राठोड यांच्यासोबत पक्षात काम करत असतानाचे त्यांचे अनुभव उपस्थितांना सांगून राठोड यांनीच मंठ्याच्या विकासात मोठी भरीव कामगिरी केली असल्याचे सांगितले. आमदार राजेश राठोड यांनाही वडिलांप्रमाणेच मोठी विकासाची कामे करून वडिलांचे नाव रोशन करण्याचा उपदेश त्यांनी केला. यावेळी माजी आमदार धोंडिराम राठोड यांनीदेखील दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे सांगून हितचिंतकांचे कौतुक करून प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सुप्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रवचन आणि खंजिरी भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सुप्रसिद्ध गायक नितीन सरकटे यांचा बहारदार मराठी, हिंदी गीतांचा कार्यक्रम, तसेच नृत्याविष्कार आयोजित करण्यात आला होता. सर्वांनी सुरक्षित अंतर व मास्कचा उपयोग करून कार्यक्रमाचा लाभ घेतला. धोंडिराम राठोड यांच्या सत्कार समारंभाच्या व्यासपीठावर लताताई राठोड, आमदार राजेश राठोड यांच्यासह त्यांचा परिवार होता.