वंदेभारत भारत एक्स्प्रेसची म्हशीला धडक; रेल्वे ४० मिनिटे थांबली; 'नोज हेड'चे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:09 IST2025-12-11T13:06:28+5:302025-12-11T13:09:24+5:30
सुदैवाने, रेल्वेचे इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

वंदेभारत भारत एक्स्प्रेसची म्हशीला धडक; रेल्वे ४० मिनिटे थांबली; 'नोज हेड'चे नुकसान
जालना : देशातील सर्वांत वेगवान रेल्वे गाड्यांपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा जालना शहरात मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता अपघात झाला. मुंबईहून नांदेडकडे जाणारी ही ट्रेन जालना येथील मुक्तेश्वर तलावाजवळील रेल्वे फाटकाजवळ आली असता एका म्हशीला तिची धडक बसली. या धडकेमुळे ट्रेनच्या पुढील भागात असलेल्या 'नोज हेड'चे नुकसान झाले. या अपघातामुळे ही रेल्वे सुमारे ४० मिनिटे अपघातस्थळी थांबल्यानंतर ती पुन्हा पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या घटनेमुळे रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली.
ही घटना मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली. वंदे भारत एक्स्प्रेस जालना रेल्वे स्थानकाकडे येत असताना मुक्तेश्वर तलावाजवळ रेल्वे ट्रॅकवर अचानक एक म्हैस आडवी आली. तेव्हा म्हशीला रेल्वेची जोरदार धडक बसली. यामुळे ट्रेनच्या पुढील भागातील 'नोज हेड'चे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, रेल्वेचे इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. अपघातानंतर ट्रेन सुमारे ४० मिनिटे ट्रॅकवर उभी राहिली. यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर रेल्वे जालना स्थानकावर पोहोचली. त्यानंतर पुढे नांदेडकडे रवाना करण्यात आली. यापूर्वीदेखील जानेवारी २०२४ मध्ये याच वंदे भारत एक्सप्रेसने लासूर स्थानकाजवळ एका बैलाला धडकल्याने दिल्याने अपघात झाला होता. ही वंदे भारत ट्रेन नांदेड ते मुंबई असा प्रवास जालनामार्गे करते आणि परत याच मार्गाने नांदेडला येते. ही रेल्वे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
जनावरांमुळे अपघात होतात...
वंदे भारत एक्स्प्रेसची म्हशीला धडक बसल्याने मंगळवारी सायंकाळी अपघात झाला होता. यात रेल्वेचे किरकोळ नुकसान झाले होते. दुरुस्तीनंतर ट्रेन पुन्हा नांदेडकडे रवाना झाली. रेल्वे ट्रॅकवर जनावरे अचानकपणे आल्यामुळे असे अपघात होतात.
- राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण मध्य रेल्वे.