दोन हजार कामगार अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST2021-05-26T04:30:49+5:302021-05-26T04:30:49+5:30
सूचना फलक गायब जालना : जालना - मंठा मार्गावरील अनेक ठिकाणचे सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे ...

दोन हजार कामगार अनुदानापासून वंचित
सूचना फलक गायब
जालना : जालना - मंठा मार्गावरील अनेक ठिकाणचे सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माळीपुरा येथील रस्त्याच्या कामास सुरुवात
जालना : शहरातील माळीपुरा वार्ड क्रमांक १३ या भागातील गांधी चमन ते एकता भवनपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले होते. या रस्त्याचे काम करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सोमवंशी प्रथम
जालना : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचद्वारा आयोजित जालना जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही निबंध स्पर्धा इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. यात भक्ती कैलास सोमवंशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मंगरूळ येथे उसाला लागली आग
तीर्थपुरी : मंगरूळ येथे रविवारी मध्यरात्री पद्याकर देशमुख या शेतकऱ्याच्या शेतात हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुरू होती. ऊसतोडणी सुरू असतानाच रात्री १२.३०च्या सुमारास मशीनने अचानक पेट घेतला. यामुळे सुरुवातीला मशीन आगीच्या लोळात सापडली. यावेळी दत्ता घांडगे हे केबीनबाहेर पडले आणि जीवितहानी टळली.
पॅंथरचे पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन
जालना : उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या काळात अनुसूचित जाती - जमाती प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांची उलट तपासणी करावी, अशी मागणी विद्रोही पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर कपिल खरात, संदीप साबळे, भास्कर बोर्डे, राहुल खरात, गौतम चित्तेकर, लाला चौधरी, महेंद्र वाघमारे, विशाल तेझाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री, जुगार यांसह इतर अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. अवैध धंद्यांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, महिला, मुलींना तळीरामांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शिवाय युवा पिढीही व्यसनाच्या आहारी जात आहे. तरी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जाफराबाद येथे कर्मचाऱ्यांना पाणी वाटप
जाफराबाद : कोरोनाच्या महामारीत आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून मोठी जोखीम घेत आरोग्य कर्मचारी नागरिकांची अँटिजन टेस्ट करीत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, मंगल सोळुंके, नितीन काकरवाल, रविराज जैस्वाल, विशाल दांडगे, विनोद फदाट आदींची उपस्थिती होती.
१६० कुटुंबियांना रेशन किटचे वाटप
जालना : कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सरकारने केलेल्या कडक संचारबंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कार्ड संस्थेच्या वतीने गोरगरिबांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुवर्णा दांडगे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, सोनिया तेलगड, सुनीता मगरे आदी परिश्रम घेत आहेत.
सेवली येथे विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी
सेवली: येथे संचारबंदीत सूचनांचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणाऱ्यांची पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने अँटिजन चाचणी करण्यात आली. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचाबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळी ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.