आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 18:38 IST2021-08-14T18:37:52+5:302021-08-14T18:38:23+5:30
सुरुमगाव येथील रेणुका राजू थोरात या गावाजवळील गट क्रमांक ९६ मधील पाझर तलावात शनिवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू
आष्टी (जि. जालना) : परतूर तालुक्यातील सुरूमगाव येथे कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मी थोरात (वय ११) व श्रावणी थोरात (९) अशी मृतांची नावे आहेत.
सुरुमगाव येथील रेणुका राजू थोरात या गावाजवळील गट क्रमांक ९६ मधील पाझर तलावात शनिवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत लक्ष्मी, श्रावणी व मुलगा परसराम ही तीन मुलेही गेली होती. तलावात अंघोळ करीत असताना लक्ष्मी व श्रावणी या पाण्यात बुडाल्या. ही बाब लक्षात येताच, रेणुका थोरात यांनी तलावात उडी घेऊन मुलींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी खोल असल्याने त्या दोघींना वाचविण्यात यश आले नाही.
रेणुका थोरात यांनी आरडाओरड केल्याने गावातील शामराव लहाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत दोघीही पाण्यात बुडाल्या होत्या. ग्रामस्थांनी दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढून आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे सुरुमगावावर शोककळा पसरली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे करीत आहेत.