शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 17:28 IST2021-03-30T17:25:18+5:302021-03-30T17:28:04+5:30
गजानन जोरले व कैलास खरात हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीर पिंपळगाव शिवारातील शेतकरी रवी कावळे यांच्या शेतात पोहण्यासाठी गेले होते.

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
जालना - शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव शिवारातील एका शेतात सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. गजानन रामलाल जोरले (३२ रा. पाणीवेस, जालना) व कैलास आसाराम खरात (३० रा. सोनलनगर) अशी मयतांची नावे आहेत.
गजानन जोरले व कैलास खरात हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीर पिंपळगाव शिवारातील शेतकरी रवी कावळे यांच्या शेतात पोहण्यासाठी गेले होते. चार वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन आलेल्या एका व्यक्तीस दोघे जण शेततळ्यात बुडाल्याचे समजले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पोहार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून दोघांना अत्यवस्थ स्थितीत बाहेर काढण्यात आले. त्यांना पोलिसांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गजानन जोडले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा मोठा परिवार आहे. तसेच कैलास खरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.