बघता बघता दोघे भाऊ पुरात वाहून गेले; एक वाचला तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:27 IST2021-06-17T18:20:04+5:302021-06-17T18:27:20+5:30
अवघडराव सावंगी येथील नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले होते

बघता बघता दोघे भाऊ पुरात वाहून गेले; एक वाचला तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला
भोकरदन ( जालना ) : तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील नदीला बुधवारी आलेल्या पुरात दोघे सख्खे चुलत भाऊ वाहून गेले होते. त्यापैकी सलीम सलाम सय्यद याला वाचविण्यात यश आले असून, शाहेद सईद सय्यद ( १९) याचा मृतदेह सापडला आहे.
भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी, पिंपळगाव रेणुकाई, पारध या परिसरात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसामुळे अवघडराव सावंगी येथील नदीला पूर आला. त्याच वेळी शाहेद सईद सय्यद व सलीम सलाम सय्यद दोघे सख्खे चुलत भाऊ चौकातून गावात चालले होते. नदीला पूर असतानाही दोघेही जण नदी ओलांडत होते. नदीपात्रात गेल्यानंतर दोघे वाहून गेले. त्यानंतर, ग्रामस्थांनी धावपळ करून नदीपात्रात बांबू टाकले. सलीम सलाम सय्यद याला पोहणे येत असल्याने त्याने बांबू धरला. त्याला ग्रामस्थांनी बाहेर काढले, तर काही वेळाने शाहेद सईद सय्यद याचा मृतदेह नागरिकांना सापडला आहे.