बारावीच्या परीक्षा होणे अनिवार्यच; एका वर्गात वीस विद्यार्थी बसवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST2021-05-25T04:33:53+5:302021-05-25T04:33:53+5:30
देशातच काय परंतु परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना मिळणार लाभ लोकमत न्यूज नेटवर्क जालना : विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी हे टर्निंग ...

बारावीच्या परीक्षा होणे अनिवार्यच; एका वर्गात वीस विद्यार्थी बसवावेत
देशातच काय परंतु परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना मिळणार लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी हे टर्निंग पॉइंट असतात. त्यामुळे या दोन्ही परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व असते. कोरोनाचे कारण देत या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत आहे हे स्पष्ट होते. ही चांगली बाबही आहे मात्र राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तेला मोठे महत्त्व आहे.
एकूणच कोरोनाची स्थिती ही आता पूर्णपणे सुधारेल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेऊनच प्रत्येकाला आता जगावे लागणार आहे. त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश राहील. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रवेश घेताना दहावी आणि बारावीची गुणवत्ताच महत्त्वाची ठरते. त्यामुळे सरकारने कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्यास त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळणार आहे.
सरकारकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. ही सरकारची बाब एका दृष्टीने बरोबरही म्हणता येईल. कारण एखाद-दुसऱ्या वर्षी परीक्षा न घेतल्यास गुणवत्ता ढासळेल हा विचार थोडा अतिरंजित वाटत असल्याचे शैक्षणिक क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांचे मत आहे. परीक्षा ऐन वेळेवर घेण्याचा निर्णय आता झाल्यास विद्यार्थी आणि पालकांची मोठी तारांबळ उडणार आहे.
परीक्षा होणे हाच एकमेव पर्याय?
परीक्षा या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. परीक्षेतील टक्केवारी ही वेगवेगळ्या पातळीवर मोजली जाते. त्यामुळे कोरोनाचे कारण देत परीक्षा न घेणे हे चुकीचे ठरू शकते. प्रत्येक वर्गामध्ये केवळ २० विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवून परीक्षा घेता येईल; तसेच सम आणि विषम परीक्षा क्रमांक देता येतील.
- प्रा. बी.वाय. कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ
राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे हित पाहिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा परीक्षा जास्त नाही. एखाद-दोन वर्ष परीक्षा घेतली नाही, तर त्यातून विद्यार्थी प्रवाहातून बाहेर पडेल, हा समज चुकीचा ठरू शकतो, असे आपले वैयक्तिक मत आहे. शेवटी सरकारचा निर्णय हा मानावाच लागेल.
- प्रा. संजय लकडे, शिक्षणतज्ज्ञ
वर्षभर विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असतात. मात्र आता कोरोना काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे परीक्षादेखील अडचणीत आल्या आहेत. शहरी भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकतील; परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र परीक्षा न झाल्यास गुणवत्तेपासून दूर राहतील, त्यामुळे कुठल्या का मार्गाने होईना परीक्षा व्हायलाच हव्यात.
- मारोती तेगमपुरे, शिक्षणतज्ज्ञ
विद्यार्थी संभ्रमात
सध्या बारावीच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू आहे. गेले वर्षभर बारावीच काय, परंतु अन्य कुठलीही महाविद्यालये ही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा अभ्यास आणि परीक्षेची तयारी झालेली नाही. त्यामुळे आता ऐन वेळेवर परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे.
- इशिता लोखंडे, विद्यार्थी
सरकारने परीक्षा जाहीर करताना कोरोनाचा विचार करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता कधी परीक्षा होणार तर कधी होणार नाहीत, असा संभ्रम निर्माण केला गेला. त्यामुळे विद्यार्थी गोंधळलेले आहेत. दहावीची परीक्षा ज्याप्रमाणे जवळपास रद्द झाली आहे, त्याच धर्तीवर बारावीचीदेखील रद्द व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- संतोष कदम, विद्यार्थी
एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक तब्बल तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमक्या परीक्षा कधी आहेत, हे लक्षात येऊन त्यादृष्टीने अभ्यासाची तयारी केली जाते. हे जरी खरे असले तरी कोरोनामुळे ऐन परीक्षांच्या तोंडावर निर्णय तळ्यात-मळ्यात होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
- नेहा पवार, विद्यार्थी