रेल्वे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची चांदी; मुंबईचे तिकीट १४०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:52 PM2022-06-27T14:52:23+5:302022-06-27T14:53:20+5:30

रविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात

Travelers' silver due to cancellation of railways; Mumbai ticket upto Rs 1400 | रेल्वे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची चांदी; मुंबईचे तिकीट १४०० रुपये

रेल्वे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची चांदी; मुंबईचे तिकीट १४०० रुपये

googlenewsNext

जालना : मध्य रेल्वेकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या २६ ते २९ जूनदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्सवाल्यांनी भाडेवाढ केली आहे. मुंबईसाठी १४०० रुपये, तर पुण्यासाठी ७०० रुपयांचे भाडे आकारले जात आहे, असे असतानाही याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष पहायला मिळत आहे याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

मध्य रेल्वेच्या अंकाई किल्ला-मनमाडदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम २९ जूनपर्यंत चालणार आहे. त्यामुळे २५ ते २९ जूनदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, नांदेड - मनमाड एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट - साईनगर शिर्डी आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जालन्यातून मुुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय, बहुतांश जण जालना ते औरंगाबाद अपडाऊनदेखील करतात. रेल्वेगाड्या बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेगाड्या बंद असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देत आहेत; मात्र ट्रॅव्हल्सचालकांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. मुंबईला जाण्यासाठी चक्क १४०० रुपये घेतले जात आहेत, तर पुण्याला जाण्यासाठी ७०० किंवा ८०० रुपयांचे तिकीट दिले जात आहे, असे असतानाही प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत आरटीओ अधिकारी विजय कोठाळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

मला मुंबईला काम आहे. रेल्वे बंद असल्याने मी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढण्यासाठी गेलो. त्यांनी चक्क १४०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे पुण्यासाठी विचारणा केली असता, ७०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे बसने जाण्याचा निर्णय घेतला.
- अजय मोरे, प्रवासी

रविवारी जास्तीचे भाडे
रविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकाने सांगितले. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ट्रॅव्हलचालकांच्या या मनमानी कारभाराकडे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Travelers' silver due to cancellation of railways; Mumbai ticket upto Rs 1400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.