जमावबंदीच्या अंमलबजावणीला नागरिक, प्रशासनाकडून तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST2021-02-20T05:29:45+5:302021-02-20T05:29:45+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले ...

जमावबंदीच्या अंमलबजावणीला नागरिक, प्रशासनाकडून तिलांजली
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. यामुळे दिलासा मिळून सर्वजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झाले होते. कोरोना हद्दपार झाला या अविर्भावात सर्वजण होते, परंतु पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळे चिंताही वाढली.
कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून पुन्हा ट्रेसेसिंग तसेच अलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे झाले आहे. मध्यंतरी सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हे सर्व प्रशासन करण्यास तत्पर आहे. परंतु मास्क आणि सॅनिटायझरसह स्वच्छतेकडे पुन्हा दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्रासपणे बाजारपेठ तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवर देखील नागरिक नियम पाळत नसल्याने पुन्हा एकदा झपाट्याने हा कोरोना फैलू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
वातावरण बदलानेही सर्दीचे रुग्ण वाढले
गेल्या आठवडाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून थंड वारे आणि अवकाळी पावसाने वातावरणात अचानक बदल झाले आहेत. काही गावांमध्ये गारपीट झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे देखील अनेक गावांमध्ये लहान-मोठ्यांना सर्दीचा त्रास जाणवत आहे.
सर्दीकडे दुर्लक्ष नको
वातावरणातील बदल तसेच पिण्याच्या पाण्यातील बदलांमुळे देखील सर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्दी झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले असून, सर्दी तसेच दोन ते तीन दिवस ताप असेल तर लगेचच चाचणी करून घेतल्यास पहिल्याच टप्प्यात असलेला कोरोना लक्षात येऊन त्यावरील उपाय करणे शक्य होतात. दुर्लक्ष केल्यास कोरोनाचा टप्पा हा मानवी श्वसन यंत्रणेत अधिक खोलवर जाऊन फुफ्फुसावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.