डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 18:29 IST2022-03-12T18:29:26+5:302022-03-12T18:29:49+5:30
दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सुरंगळी फाट्याजवळ दिवसाढवळ्या घडली

डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली
भोकरदन ( जालना ) : तालुक्यातील सुरंगळी फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनातून आलेल्या चार जणांनी ई-कॉमर्स वेबसाईटच्या एका डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळील रोख रक्कम आणि पार्सल असा तब्बल 1 लाख 36 हजार 663 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख शेहबाज शेख सज्जात शुक्रवारी दुपारी आपल्या चारचाकीत ( एम एच 20 बिटी 2174 ) एआईएम लॅजिस्ट कंपनीचे पार्सल व माल वाटप करण्यासाठी जालना येथून सुरंगळीसह इतर गावात गेला होता. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान शेख शेहबाज गाडीसह सुरंगळीकडून भोकरदनकडे येत होता. यावेळी अचानक एक ओमनी गाडी त्याच्यासमोर आली. त्यातील चार व्यक्ती बाहेर येत शाखे शेहबाजच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर चारचाकीच्या खिडकीचा काच फोडून आतील पार्सल, मोबाईल आणि रोख ९३ हजार रुपये असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी आज भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे हे करीत आहेत.