जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये २,३२२ महिला कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:38 IST2021-01-23T18:36:40+5:302021-01-23T18:38:28+5:30
gram panchayat ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये २,३२२ महिला कारभारी
जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. ४,१६४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महिलांनी मोठा सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात तब्बल २,३२२ महिला निवडून आल्या आहेत.
जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६९८ जागांसाठी मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून १२,३३२ पैकी ४,१४४ उमेदवारांनी विजय मिळविला. यात २,३२२ महिला उमेदवार आहेत.
भोकरदन तालुक्यात सर्वाधिक महिला उमेदवार
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ४६६ महिला उमेदवार निवडून आले आहेत. त्यानंतर जालना तालुक्यात ४०८, बदनापूर- २८४, जाफराबाद- ९३, परतूर- १७८, मंठा- २३९, अंबड- ३४९ तर घनसावंगी तालुक्यात ३०५ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.
आरोग्याशी निगडित प्रश्नांना प्राधान्य
मी प्रथमच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहे. मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला निश्चितच येत्या पाच वर्षांत न्याय देण्याचा प्रयत्न करेन. टेंभुर्णी गावात सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृह उपलब्ध नाही. प्राधान्यक्रमाने मी महिलांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न सर्वप्रथम सोडविण्यास प्राधान्य देईल. यासोबतच गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करेल.
- सुमन लक्ष्मण म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य
स्वच्छतेचा प्रश्न सर्वप्रथम
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच मी राजकारणात प्रवेश केला आहे. टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांत आम्ही दहा जणी निवडून आल्याने निश्चितच जनतेने या सभागृहात महिलांना झुकते माप दिले आहे. जनतेच्या या कौलाचा आदर करीत महिलांच्या प्रश्नांसोबतच गावातील स्वच्छतेचा प्रश्न सर्वप्रथम सोडविण्यास मी प्राधान्य देईल.
- शिल्पा धनराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्य
महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी द्यावी.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनतेने मला दुसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. मागील पंचवार्षिकला शेवटच्या कार्यकाळात एक वर्ष माझ्याकडे उपसरपंचपद होते. ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी आपण प्रयत्न केले. यापुढेही गणेशपूर व टेंभुर्णीच्या विकासात्मक कामासाठी सदैव तत्पर राहीन. पुरुषांनी महिलांच्या अधिकारावर गदा न आणता महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी द्यावी.
- उषा गणेश गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य