अनुदान का थकविले? 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली
By विजय मुंडे | Updated: August 13, 2024 17:55 IST2024-08-13T17:53:57+5:302024-08-13T17:55:58+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका

अनुदान का थकविले? 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली
जाफराबाद : शेतकरी, निराधारांचे अनुदान थकविल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी वरूड बुद्रुक (ता. जाफराबाद) येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापकांच्या कानशिलात लगावली. या घटनेने बँकेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेतून पीककर्जाचे वेळेत वाटप होत नाही, निराधारांचे अनुदान थकविले जाते, वयोवृद्धांचे अनुदान वेळेत वाटप होत नाही यासह इतर अनेक तक्रारी होत्या. शेतकरी, नागरिकांची अडवणूक होऊ नये, यासाठी वारंवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदनेही देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांची अडवणूक सुरूच होती.
शेतकऱ्यांची अडवणूक का केली? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने जाब विचारात बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली, जाफराबाद तालुक्यातील घटना. #jalananewspic.twitter.com/15JOTOKmlB
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 13, 2024
वरूड बुद्रुक येथील प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी शाखा गाठली. बँक व्यवस्थापक धीरज सोनकर यांना शेतकरी, निराधारांचे अनुदान वाटप का थांबविले लेखी कशाबद्दल मागितले जातेय यासह इतर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. याचवेळी जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी शाखा व्यवस्थापकांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे बँकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेतकरी, निराधार, विधवांसह खातेदारांची कोणत्याही प्रकारे अडवणूक करू नये, पीककर्जासह सर्वच अनुदानाचे वितरण करावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. बँक अधिकाऱ्यांनी मागण्यांनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात बँकेकडून पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.