मद्यपी मुलासोबत टोकाचे भांडण झालं, संतापलेल्या वडिलांनी गळा आवळून केला खून
By विजय मुंडे | Updated: May 5, 2023 14:36 IST2023-05-05T14:31:08+5:302023-05-05T14:36:04+5:30
गळफास घेतल्याचा बनाव उघडकीस; शवविच्छेदन करताना मृतदेहावर जखमा आढळून आल्याने उघडकीस आला खून

मद्यपी मुलासोबत टोकाचे भांडण झालं, संतापलेल्या वडिलांनी गळा आवळून केला खून
धावडा (जि. जालना) : दारूच्या आहारी गेलेल्या मुलासोबत झालेल्या भांडणात वडिलांनीच त्याचा गळा अवळून खून केला. त्यानंतर वडिलांनी मुलाने गळफास घेतल्याचा बनाव केला. ही घटना विझोरा (ता. भोकरदन) येथे बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात मयत मुलाच्या वडिलांविरुद्ध गुरुवारी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य गजानन आढाव (वय २१), असे मयत युवकाचे नाव आहे. आदित्य गजानन आढाव याने बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर गणेश पंडित गावंडे यांनी पारध पोलिस ठाण्यात दिली होती. प्रारंभी, या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; परंतु धावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पार्थिव आणले. डॉ. प्राजक्ता ताठे, डॉ. महेश गायकवाड, सपोनि अभिजित मोरे यांना मयताच्या पार्थिवावर जखमा दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वडिलांनीच त्याचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले.
मयत आदित्य याला दारूचे व्यसन होते. यातूनच बुधवारी रात्री आदित्य आणि त्याचे वडील गजानन येडुबा आढाव यांच्यात भांडण झाले. त्यावेळी गजानन आढाव यांनी आदित्यचा गळा आवळून खून केल्याची तक्रार मयताची आई संगीता आढाव यांनी पारध पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गजानन आढाव यांच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी पारध पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि ए.एस. मोरे करीत आहेत. मयताच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.