अट्टल गुन्हेगार कारमध्ये पळाला, टायर फुटले तरीही दिला पोलिसांना चकवा
By दिपक ढोले | Updated: August 23, 2022 18:02 IST2022-08-23T18:02:23+5:302022-08-23T18:02:46+5:30
बनावट नंबर प्लेट लावून चालवायचा कार : अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अट्टल गुन्हेगार कारमध्ये पळाला, टायर फुटले तरीही दिला पोलिसांना चकवा
जालना : पोलीस पाठलाग करीत असतानाच अट्टल गुन्हेगाराच्या कारचे टायर फुटले. असे असतानाही पोलिसांना चकवा देत त्याने पळ काढल्याची घटना अंबड शहरात सोमवारी घडली. बबलू भुजंग पवार (३५, रा. राहेरा, ता. घनसावंगी) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या ताब्यातील कार पोलिसांनी जप्त केली असून, त्या कारला बनावट क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले.
अट्टल गुन्हेगार संशयित बबलू पवार हा अंबड शहरातील पंडित जळगावकर नाट्यगृहाजवळ उभा असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पथक तेथे गेले. त्याने पोलिसांना पाहताच, कारमध्ये बसून पळ काढला. लोकांच्या जीवितेस धोका होईल, अशा पध्दतीने कार चालविली. निपाणी पिंपळगाव ते राणी उंचेगाव रोडवर त्याच्या कारचे टायर फुटले. त्याच वेळी त्याने पळ काढला. पोलिसांनी सदरील कार जप्त करून तिच्या कागदपत्रांची शहानिशा केली असता, त्या कारचा क्रमांक दुसराच आढळून आला. या प्रकरणी सपोनि. सोमनाथ नरके यांच्या फिर्यादीवरून संशयित बबलू भुजंग पवार याच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.