महायुतीची कसोटी, काँग्रेसची परीक्षा; इच्छुकांची संख्या वाढल्याने जागा वाटपाची डोकेदुखी, माघार घेणाऱ्यांकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:26 IST2025-12-20T11:25:05+5:302025-12-20T11:26:04+5:30
जालना महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढली जावी, यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

महायुतीची कसोटी, काँग्रेसची परीक्षा; इच्छुकांची संख्या वाढल्याने जागा वाटपाची डोकेदुखी, माघार घेणाऱ्यांकडे लक्ष
विजय मुंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दोन वर्षापूर्वी जालना नगरपालिकेचे महानगर पालिकेत रूपांत झाले. प्रथम होणाऱ्या मनपा निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजप, शिंदेसेनेने जोर लावला आहे. महायुतीचा निर्णय झाला नसला तरी सत्ता आमचीच अन् महापौरही आमचाच असा दावा केला जात आहे. दुसरीकडे नगरपालिकेत १० वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
जालना महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढली जावी, यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत; परंतु मित्रपक्षांत इच्छुकांची संख्या दीडशेवर आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीवर शिक्कामोर्तब होईल का? असा प्रश्न आहे. विरोधी पक्षातील अनेक स्थानिक पदाधिकारी पक्षात आल्याने स्वबळाची भाषाही बैठकांमध्ये केली जात आहे. दुसरीकडे नगरपालिकेत सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार असून, मविआची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकूण प्रभाग किती आहेत? - १६
एकूण सदस्य संख्या किती? - ६५
कोणते मुद्दे निर्णायक?
१. जालना शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा. घंटागाड्यांचे बिघडलेले वेळापत्रक. शहरातील विविध भागांतील अस्वच्छतेमुळे वाढणारी रोगराई.
२. ओपन स्पेसवर होणारी अतिक्रमणे, बगिच्यांचा अभाव, अंतर्गत भागातील खराब झालेले रस्ते, वाढीव वस्त्यांवर रस्त्यांसह इतर असलेल्या मूलभूत समस्या आदी मुद्यांवर सर्वपक्षीयांकडून निवडणूक लढविली जाईल.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप - ११
शिवसेना - ११
राष्ट्रवादी काँग्रेस - ०९
काँग्रेस - २८
मनसे - ००
इतर - ०२
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण - २,११,३७८
पुरुष - १,१०,५२१
महिला - १,००,८२९
इतर - २६
आता एकूण किती मतदार ?
एकूण - २,४५,९२९
पुरुष - १,२८,८९४
महिला - १,१७,००१
इतर - ३४
बंडखोरी रोखणे आव्हानच
महानगरपालिका निवडणुकीसाठी ज्येष्ठांसह शेकडो युवक इच्छुक आहेत. त्यामुळे बंडखोरी रोखणे हे नेत्यांसमोर आव्हान राहणार आहे.