दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:27 IST2025-05-01T05:26:17+5:302025-05-01T05:27:14+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते.

दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
जालना : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येला २१ एप्रिल रोजी सायंकाळी ‘आप काश्मिरी हो क्या? हिंदू हो क्या? आप यहाँ के नही लगते’, असे प्रश्न विचारत दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा जालना येथील आदर्श राऊत याने बुधवारी केला आहे. दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर स्वत:सोबत घडलेल्या घटनेची माहिती ‘एनआयए’ला ई-मेलद्वारे दिल्याचेही राऊत यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तेथे चालत किंवा घोडा घेऊन जावे लागते. त्यामुळे आदर्श याने घोडा घेऊन वर जाणे पसंत केले. ते मॅगी स्टॉलवर थांबले असता पाच-सहा जण त्यांच्याकडे आले.
आप यहाँ के नही लगते? यावर आदर्श म्हणाला...
‘आप काश्मिरी हो क्या, आप हिंदू हो क्या, आप यहाँ के नही लगते’, असे प्रश्न त्यांनी केले. त्यावर आदर्श याने ‘नही, मैं यहाँ का ही हूँ...’ असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्ती ‘आज भीड कम है’ असे म्हणत तेथून निघून गेल्या. त्यानंतर आदर्श राऊत हा हॉटेलमध्ये गेला.
दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला सकाळी ते श्रीनगरमध्ये गेले. त्याचवेळी पहलगाममध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली. सर्व पर्यटक भयभीत झाले.
२१ ला करायचा होता हल्ला
घटनेनंतर दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाले. त्यातील एकाने आपल्याशी संवाद साधल्याचे आदर्शने वडिलांना सांगितले. दहशतवाद्यांनी केलेली विचारणा पाहता त्यांना २१ एप्रिलला हल्ला करावयाचा होता; गर्दी कमी असल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी हल्ला केल्याचे दिसते.
वडिलांशी चर्चा केल्यानंतर आदर्श याने ‘एनआयए’ला ई-मेलद्वारे माहिती दिली. विमान प्रवास सुरू झाल्यानंतर २६ रोजी श्रीनगरहून मुंबई येथे आणि तेथून रेल्वेने जालन्यात आल्याचेही आदर्श राऊत म्हणाला.
‘सीआयडी’ने केला संपर्क
राऊत याने ई-मेल केला असला तरी अद्याप एनआयएकडून त्यांच्याशी संपर्क करण्यात आलेला नाही. परंतु ही माहिती मिळताच बुधवारी सीआयडीच्या पथकाने आदर्श राऊत याच्याशी संपर्क साधून चौकशी केली आहे.