याद्यांमध्ये फेरबदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST2021-02-20T05:29:13+5:302021-02-20T05:29:13+5:30
माजी नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन मंठा : येथील नगर पंचायत निवडणुकीसाठी नुकत्याच मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात ...

याद्यांमध्ये फेरबदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
माजी नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
मंठा : येथील नगर पंचायत निवडणुकीसाठी नुकत्याच मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, या याद्यांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. याची चौकशी करण्यात यावी, तसेच फेरबदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी नगरसेवकांनी नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले. या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मंठा नगर पंचायत निवडणुकीसाठी सन २०१५ च्या विधानसभा निवडणुकीतील याद्यानुसार प्रभागाची रचना होणार असल्याचे सूचित करण्यात आले होते; परंतु २०१५ च्या मतदार याद्या आणि नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्या यात मोठी तफावत आहे. ग्रामीण भागातील काही नागरिकांची नावे ही शहरातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. हे लोक शहरात आणि ग्रामीण भागातही मतदान करतात. याची चौकशी व्हावी, तसेच याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर कैलास बोराडे, राजेश मोरे, शेख एजाज्जोद्दीन, बालासाहेब घनवट, नितीन मोरे, नारायण दवणे, रामजी दहातोंडे, भगवान कुरधने, संतोष गधे, धरम गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.
नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत; परंतु या प्रारुप याद्यांविषयी ज्या काही हरकती येतील, त्यावर नगर पंचायतकडून कारवाई केली जाईल.
सतीश कुलकर्णी, मुख्याधिकारी, नगर पंचायत मंठा.