३० वर्षीय महिलेची दोन मुलींसह आत्महत्या
By दिपक ढोले | Updated: August 26, 2023 22:23 IST2023-08-26T22:22:54+5:302023-08-26T22:23:25+5:30
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

३० वर्षीय महिलेची दोन मुलींसह आत्महत्या
जालना : ३० वर्षीय महिलेने दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडली. शारदा शरद घनघाव (३०), दर्शना शरद घनघाव (४) व हर्षता शरद घनघाव (वय दीड वर्ष), अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
डोंगरगाव येथे शनिवारी सकाळपासून लाइट नसल्याने गावातील विष्णू साहेबराव घनघान लाइनमन व काही ग्रामस्थांसोबत गावाकडील विद्युत रोहित्राकडे जात होते. त्यावेळी गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत त्यांनी बदनापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, उपनिरीक्षक शेळके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
याप्रकरणी विष्णू घनघाव यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा मृत शारदा घनघाव यांच्या आसरखेडा येथील माहेरकडील नातेवाईक बदनापूर ग्रामीण रुग्णालयात व पोलिस ठाण्यात आले. आपल्या मुलींसह नातींचा घातपात झाला असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलिस निरीक्षक सुदाम भागवत कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत बदनापूर ग्रामीण रुग्णालयात हजर होते. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करत आहेत.