साखरेच्या भावाने उचांक गाठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:06+5:302021-08-23T04:32:06+5:30
जालना : जागतिक स्तरावर साखरेचे भाव वधारल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळणार असून, यामुळे साखर कारखान्याचा आर्थिक बोजा कमी ...

साखरेच्या भावाने उचांक गाठला
जालना : जागतिक स्तरावर साखरेचे भाव वधारल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळणार असून, यामुळे साखर कारखान्याचा आर्थिक बोजा कमी होऊन शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीनुसार भाव देण्यासोबतच पूर्व हंगामासाठी पैसा उपलब्थ होणार आहे. यामुळे कारखान्यांना दरवर्षीप्रमाणे पूर्वहंगाम कर्जासाठी बँकांची पायरी चढावी लागणार नाही, अशी चिन्हे आहे.
ब्राझीलमध्ये थंडी आणि उन्हाचा तडाखा बसल्याचे
परिणाम आता दिसू लागले आहेत. त्याचा फायदा भारताला
मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच आपल्या शिपमेंटच्या पाच महिने आधी साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. थंडीचा कडाका सुरू
असल्याने ब्राझीलमध्ये उत्पादन घसरणीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी साखर खरेदीदारांना भारताने ॲडव्हान्स स्वरुपात साखर पुरवठ्याचे करार करण्यास पुढाकार घेतला आहे.
जगातील सर्वात मोठे साखर उत्पादक आणि निर्यातदार
असलेल्या ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन आधी उन्हाचा तडाखा आणि आता थंडीमुळे घसरण्याच्या मार्गावर आहे. ब्राझीलमध्ये थंडी आणि उन्हामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, संभाव्य घसरणीपूर्वीच साखरेचे दर तीन वर्षाच्या आपल्या उच्चांकावर पोहोचले आहेत. यादरम्यान, खरेदीदारांनी जगातील द्वितीय क्रमांकाचा साखर उत्पादक देश भारताकडून आधीच साखर पुरवठ्याचे करार करण्यावर भर दिला आहे. परिणामी आतापर्यंत व्यापाऱ्यांनी डिसेंबर आणि जानेवारीत शिपमेंटसाठी ५,००,००० टन कच्ची साखर फ्री ऑन बोर्ड (एफओबी) या आधारावर ४३५ डॉलर आणि ४४० डॉलर प्रतिटन यादरम्यान करार सुरू केले आहेत. भारतीय व्यापारी नेहमी एक अथवा दोन महिने आधी करार करतात. सरकारकडून विदेशी साखर विक्रीसाठी अनुदान जाहीर झाल्यावर साखर निर्यात करतात. मात्र, जागतिक स्तरावर दरवाढ झाल्याने सरकारच्या मदतीशिवाय साखर निर्यातीला चांगले दिवस आले आहेत. साखर कारखान्यांनी निर्यातीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. उच्चांकी निर्यात होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील चांगल्या दराचा फायदा कारखान्यांना
झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ७० लाख टन निर्यातीची शक्यता आहे. ही आतापर्यंत उच्चांकी निर्यात असेल. भारताने २०२०-२१ च्या दरम्यान ६० लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदान जाहीर केले आहे. अलिकडेच केंद्र सरकारने साखर निर्यातीचे अनुदान ६००० मेट्रिक टनावरून घटवून ४००० मेट्रिक टन केले आहे. जालना बाजारपेठेत साखरेचे भाव ३५५० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.