मंठा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:50+5:302020-12-27T04:22:50+5:30

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ...

Strategy for 50 Gram Panchayats in Mantha taluka | मंठा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी व्यूहरचना

मंठा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी व्यूहरचना

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी तगडे उमेदवार आपल्याच पॅनलमध्ये यावेत, कागदपत्रांची पूर्तता असावी, याकडे पॅनलप्रमुखांचा कल आहे. शिवाय निवडणुकीतील विजयासाठी आतापासूनच व्यूहरचना आखल्या जात आहेत.

प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतु, एकाही गावातून वैयक्तिक किंवा पॅनलमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुक गर्दी करीत आहेत. तर निर्माण होणाऱ्या शंकाचे निरसन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे. सध्या गावपातळीवर कार्यकर्ते एकमेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात, भावकीची मनधरणी करण्यात आणि पॅनलची जुळवाजुळव करण्यातच मग्न आहेत. कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे कोणा- कोणाला पॅनलमध्ये घेणार ? असा प्रश्न पॅनलप्रमुखांना पडला आहे. इच्छुकांना नाराज केले तर बंडखोरी होण्याची शक्यताही अनेक ठिकाणी वर्तविली जात आहे. हे बंडखोर विरोधी गटात सामील झाले तर पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे.

तालुक्यावर काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांची चांगली पकड आहे. त्यामुळे या निवडणुका काँग्रेस गटासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. मंठा तालुक्यात मागील पंचवार्षिकमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडल्यामुळे दोन गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. तर तीन गावांमध्ये सदस्य बिनविरोध, तर फक्त सरपंचांच्याच निवडीसाठी मतदान घेण्यात आले होते. परंतु यावेळी होऊ घातलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत यावी, यासाठी नेतेही प्रयत्न करत आहेत.

मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष

इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. हे करताना मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, मतदार यंदा कोणाला ग्रामपंचायतीत बसवितात हे १८ जानेवारी रोजी समोर येणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होणार आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी इच्छूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करुन त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Strategy for 50 Gram Panchayats in Mantha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.