जालना : गत आठ-दहा दिवस दिवस जिल्ह्यात बरसणारा पाऊस गायब झाला असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे खासगी, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.
यंदा वेळेवर आलेला पाऊस मध्यंतरी गायब झाला होता. मोठ्या खंडानंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. आठ-दहा दिवस झालेला हा पाऊस कोठे मध्यम स्वरूपाचा, तर कुठे रिमझिम पाऊस झाला. त्यात आता पुन्हा कडक ऊन पडू लागले आहे. अचानक वातावरणात बदल होऊ लागल्याने विविध आजार फैलावू लागले आहेत. याचा सर्वाधिक त्रास लहान बालकांसह वयोवृद्धांना होत असल्याचे चित्र रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण संख्येवरून दिसत आहे.
वातावरण बदलले; काळजी घ्या...
मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणात दैनंदिन खाद्यपदार्थांवर लक्ष द्यावे.
पिण्याचे पाणी शक्यतो उकळून प्यावे किंवा पाणी निर्जंतुकीकरण करून प्यावे.
बाहेरील खाद्यपदार्थ, शीतपेये घेणे टाळावे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
सर्दी, खोकला, ताप यासह इतर आजार असतील तर ते अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.
पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी
जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली होती.
जुलैअखेर आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पावसाने मोठी दडी मारली होती.
पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती.
यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १०३ टक्के पाऊस झाला आहे.