भरधाव पिकअपची पोलिस व्हॅनला धडक; दोन पोलिस कर्मचारी जखमी
By दिपक ढोले | Updated: April 27, 2023 19:23 IST2023-04-27T19:23:19+5:302023-04-27T19:23:51+5:30
धडक दिल्यानंतर पोलिस व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली.

भरधाव पिकअपची पोलिस व्हॅनला धडक; दोन पोलिस कर्मचारी जखमी
जालना : गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनला द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळा येथे बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गणेश मुंडे, जमादार विलास वाघमारे हे बोलेरो जीप क्रमांक (एमएच १२ - बीक्यू ५२४१)ने बुधवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ते सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा येथे आले. त्याचवेळी पंढरपूरहून मध्य प्रदेशात द्राक्ष घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअपने (क्रमांक एमएच ४९ - एटी ८७७३) पोलिस व्हॅनला पाठीमागून जोराची धडक दिली.
धडक दिल्यानंतर पोलिस व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालक गणेश मुंडे आणि विलास वाघमारे हे गंभीर जखमी झाले. याची माहिती गोंदी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अंबड येथे पाठविले. या प्रकरणी गणेश मुंडे यांच्या फिर्यादीवरून संशयित तुकाराम बेंडे (रा. मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कुठे करीत आहेत.