काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:54 IST2021-04-08T19:53:16+5:302021-04-08T19:54:48+5:30
जवान गोपाल मधुकर कांबळे यांचे तीन वर्षांपूर्वी मनीषा कांबळे यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. मनीषा कांबळे या ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत.

काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू
भोकरदन (जि. जालना) : काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना आजारी पडलेले भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील जवान गोपाल मधुकर कांबळे (२४) यांचा दिल्ली येथील सैनिकी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्यावर महिनाभरापासून दिल्ली येथील सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू होते.
जवान गोपाल मधुकर कांबळे यांचे तीन वर्षांपूर्वी मनीषा कांबळे यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. मनीषा कांबळे या ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत. मात्र, बाळ जन्माला येण्याआधीच वडिलांचे छत्र हरवले गेले. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने गोपाल कांबळे सैन्यात भरती झाले होेते. सैन्यात भरती होण्यापूर्वी बाभूळगाव येथे ते सलूनचा व्यवसाय करीत होते. मात्र, मोठा भाऊ सतीश कांबळे हे बीएसफमध्ये नोकरीला असल्याने गोपाल कांबळे यांनीसुद्धा सैन्यात भरतीची तयार केली. चार वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. मात्र, महिनाभरापूर्वीच गोपाल कांबळे हे आजारी पडले होते. त्यांना उपचारासाठी दिल्ली येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री १० वाजता त्यांचे निधन झाले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गोपाल कांबळे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती विशाल गाढे यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.