ऑनलाइन गेमच्या नादात शेतीसह कारही विकली; जालन्यातील तरुणाने गमावले ४० लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 08:28 IST2023-04-15T08:10:19+5:302023-04-15T08:28:28+5:30
ऑनलाइन गेमच्या नादात एका युवकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना

ऑनलाइन गेमच्या नादात शेतीसह कारही विकली; जालन्यातील तरुणाने गमावले ४० लाख रुपये
जालना :
ऑनलाइन गेमच्या नादात एका युवकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जालना तालुक्यातील ढगी येथे उघडकीस आली आहे. परमेश्वर केंद्रे (वय ३७) असे त्या तरुणाचे नाव आहे. यासाठी त्याला एक एकर शेतीसह १७ लाख रुपयांची कारही विकावा लागली. याबाबत त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
परमेश्वरने दोन वर्षांपूर्वी मोबाइलमध्ये मॉस्ट बेट हा गेम डाऊनलोड केला होता. सुरुवातीला त्याने १०० ते १००० रुपयांपर्यंत पैसे लावले. त्यात तो जिंकत गेला. त्यानंतर २५ ते ३० लाख रुपयांची बेट लावली. त्याच्या खात्यावर पैसेदेखील आले. एकदा तर तो जवळपास ३९ कोटी
२५ लाख ९१३ रुपये जिंकला होता.
ते पैसे काढण्यासाठी गेला असता, पैसेच निघाले नाही. त्याने सुरुवातीला स्वत:कडे असलेली १६ लाख रुपयांची कार विकून गेममध्ये पैसे भरले. गावात असलेली एकर शेतीही त्याने विकली.
जिंकण्याचे आमिष पडले भारी
एका परदेशी कंपनीने मॉस्ट बेट गेमची निर्मिती केली आहे. सुरुवातीला पैसे लावल्यानंतर दुप्पट पैसे मिळतात या आमिषापोटी खेळणे सुरू करतात. नंतर गेमचे व्यसन लागते.
परमेश्वर केंद्रे या तरुणाची ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. त्याने कोणत्या बँकेतर्फे पैसे भरले आहेत, त्याचे स्टेटमेंट मागितले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. तरुणांनी गेमच्या आहारी जाऊ नये.
- मारुती खेडकर, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.