नर्सरीच्या झाडाआडून तस्करी; ट्रकमधून १२ पोती गांजा जप्त, दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 15:10 IST2021-12-24T15:08:20+5:302021-12-24T15:10:04+5:30
Cannabis seized in Jalana : ट्रकमध्ये नर्सरीतील विविध झाडाची रोपे रचून ठेवण्यात आलेली होती.

नर्सरीच्या झाडाआडून तस्करी; ट्रकमधून १२ पोती गांजा जप्त, दोघे ताब्यात
जालना : तस्करांनी नर्सरीच्या झाडाआडून गांजाची तस्करी केल्याचे आज सकाळी कर्णावळ फाट्याजवळ उघडकीस आले आहे. आंध्रप्रदेशातून आलेल्या एका ट्रकमध्ये बाहेरून नर्सरीची झाडे तर आत गांजा लपविण्यात आला होता. पोलीस कारवाईत १८ लाख रुपयांचा तब्बल ३ क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे.
आंध्रप्रदेशातून एक गांजा घेऊन येणारा ट्रक आज सकाळी परभणी - मंठा रोडवरील कर्णावळ फाट्याजवळ पोलिसांनी पकडला. ट्रकमध्ये बाहेरून आणि पाठीमागून नर्सरीतील विविध झाडाची रोपे रचून ठेवण्यात आलेली होती. ट्रकची झडती घेतली असती नर्सरीतील रोपाखाली गांजाने भरलेले 12 पोती आढळून आली. हा गांजा अंदाजे तीन क्विंटल असून, तो अंदाजे 18 लाख रुपयांचा आहे.
पोलिसांनी 18 लाखाचा गांजा, 12 लाखाचा ट्रक आणि 6 लाखाची नर्सरीची रोपे जप्त केली आहेत. याप्रकरणी भोकरदन तालुक्यातील दोन व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.