जालन्यात सहा नवीन ऑक्सिजन प्लांट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST2021-05-27T04:31:52+5:302021-05-27T04:31:52+5:30
जालन्यात आता ऑक्सिजनसह रेमडेसिविरची मागणी तुलनेने कमी झाली आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले जवळपास २०० पेक्षा अधिक बेड शिल्लक आहेत. ...

जालन्यात सहा नवीन ऑक्सिजन प्लांट उभारणार
जालन्यात आता ऑक्सिजनसह रेमडेसिविरची मागणी तुलनेने कमी झाली आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले जवळपास २०० पेक्षा अधिक बेड शिल्लक आहेत. परंतु कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता सरकारने ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून जालन्यातील कोविड रुग्णालय परिसरात डीआरडीओ अर्थात भारतीय संरक्षण रिसर्च आणि विकास संस्थेकडून दोन टन ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट मंजूर केला असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची कितीही गरज पडली तर जालन्यात अडचण येणार नाही या दृष्टीने ही तयारी सुरू आहे.
जालन्याप्रमाणेच राजूर, अंबड, परतूर तसेच घनसावंगी येथेही शंभर किलो ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात येणार आहेत. त्यांचेही काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली. सद्य:स्थितीत जालन्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये दोन मोठे लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीचे प्लांट याआधीच निर्माण करण्यात आल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालन्यात ऑक्सिजनचा प्रश्न कमी प्रमाणात निर्माण झाला होता.
रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा
कोरोनाच्या चाचण्या वाढवूनही कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण गेल्या आठवडाभरात तुलनेने कमी झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तर कोराेना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३०० पेक्षा कमी होती. त्यामुळे दिलासा मिळाला असून, आता मृत्युदरही कमी होत असल्याने नागरिकांमधील चिंता कमी झाली आहे. ही चिंता कमी झाली असली तरी तिसरी लाट येणार असल्याचे संकेत मिळत असल्याने यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे.