साहेब...अवकाळीने सर्वच हिरावले; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:45 IST2019-11-25T12:41:17+5:302019-11-25T12:45:06+5:30
पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली.

साहेब...अवकाळीने सर्वच हिरावले; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो
जालना : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आमचे मोठे नुकसान झाले असून आता शिल्लक कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळण अवघड झाले आहे. रबी पेरणीही आता शक्य नसल्याने आम्हाला एकरी किमान २० हजाराची मदत मिळावी, अशी मागणी जालना तालुक्यातील दरेगाव येथील महिला शेतकरी शांताबाई शेळके, कैलास ढवळे या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांकडे केली.
पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली. तर गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांचीही पथकाने पाहणी केली. या पथकाने कडेगाव, चांदई एक्को, अकोलादेव येथेही भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. पथकाचे प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, उपायुक्त सदानंद टाकसाळे, विभागीय सहसंचालक कृषी साहेबराव दिवेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी सुखदेव उपस्थित होते.
यावेळी दरेगाव येथील मका उत्पादक शेतकरी कैलास ढवळे यांच्या शेतात मका तसाच पडून होता. आता तुम्ही रबीची पेरणी करणार काय, यावर शेतकऱ्यांनी आता वेळ निघून गेल्याचे सांगून आता हे शक्य नसल्याचे सांगितले. दरेगाव येथील शांताबाई शेळके यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. शेतात जाताना आजही पाण्याचा वापसा न झाल्याने अधिकाऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागला. यावेळी दीड एकर कापूस आम्ही लावला होता, असे सांगून यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे सांगितले. गवळी पोखरी शिवारातील दीपक गंडाळ यांच्या द्राक्ष बागेत मोठे विदारक चित्र त्यांना दिसून आले. यावेळी गवळी पोखरी गावात न जाता रस्त्यावरील शिवारातच अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा थांबून त्यांनी अवघ्या दहा मिनिटातच एक, दोन प्रश्नोत्तर विचारून पथक सुसाट निघून गेले. यावेळी गवळी पोखरीचे सरपंच गणेश वाघमारे, रवी कायंदे, विधाते व शेतकरी नाराज झाले होते.
कापूस वेचणीला मजूर मिळेना
कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याची बाबही पथकाच्या लक्षात आणून देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी दिवेकर हे शेतकऱ्यांना मराठीतून प्रश्न विचारून नंतर ते पथकातील अधिकाऱ्यांना इंग्रजीतून भाषांतर करून सांगत होते. पीकविमा काढला आहे काय असा सवालही यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसून आले.