धक्कादायक! जालन्यात सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला
By विजय मुंडे | Updated: April 2, 2025 11:37 IST2025-04-02T11:37:09+5:302025-04-02T11:37:30+5:30
पोलिसांचे पथक फरार सुनेच्या मागावर आहे.

धक्कादायक! जालन्यात सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला
जालना: शहरातील भोकरदन नाका येथे सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.सविता संजय शिनगारे ( ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितल्या नुसार, प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिनगारे या सून प्रतीक्षा शिनगारे यांच्यासोबत किरायच्या घरात राहत. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून दोघीच होत्या. कौटुंबिक वादातून बुधवारी पहाटे सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला. मात्र, घर मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत प्रतीक्षा मृतदेह सोडून फरार झाली होती. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, सदरबाजार पोलिस ठाण्याचे पोनि. संदीप भारती व इतरांनी भेट देवून पाहणी केली.
मृतदेह विल्हेवाट लावण्याचा होता हेतू
सून प्रतीक्षा यांनी सासू मृत्युमुखी पडल्याचे पाहताच मृतदेह पोत्यात भरला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने पोते घराच्या बाहेर काढत असताना प्रतिक्षाला घर मालकाने पाहिले. पोते अवजड असल्याने प्रतिक्षाला ते बाहेर नेता आले नाही. यातच घर मालकाला संशय आल्याचे लक्षात येताच प्रतीक्षा तेथून फरार झाली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज घेतले आहेत. आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदरबाजार पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.