धक्कादायक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेऊन महिलेवर अत्याचार
By दिपक ढोले | Updated: July 21, 2023 19:30 IST2023-07-21T19:29:46+5:302023-07-21T19:30:15+5:30
याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेऊन महिलेवर अत्याचार
बदनापूर (जि. जालना) : लिफ्ट देऊन शेतात नेऊन ४० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथे गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शुक्रवारी दोन संशयितांविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. ती गुरुवारी जालना येथे बसची वाट पाहत थांबली होती. त्याचवेळी संशयित भरत रामदास वाघ (रा. चंदनझिरा, जालना) हा दुचाकीने छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. त्याने पीडित महिलेला पाहून दुचाकी थांबविली. तुला कोठे जायचे आहे, असे विचारून पीडितेला दुचाकीवर बसविले. काही वेळानंतर मित्राच्या शेतात जाऊन यायचे आहे, असे सांगून सेलगाव येथे नेले. तेथे संशयित तुकाराम अरुण अंभोरे (रा. सेलगाव, ता. बदनापूर) हा कार घेऊन थांबलेला होता.
पीडित महिलेस कारमध्ये बसवून ते शेतात घेऊन गेले. शेतातील पत्राच्या शेडमध्ये नेऊन त्या महिलेवर अत्याचार केला. जर कोणाला सांगितले तर जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक भागवत, पोउपनि खार्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.