टाकीचे घाव देतो दगडाला आकार अन् जीवनाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:45 IST2018-01-16T00:44:28+5:302018-01-16T00:45:18+5:30
पाटा-वरवंटा अन् जात्याची जागा मिक्सर आणि गिरणीने घेतली असली तरी आजही ग्रामीण भागात प्रत्येक घरी पाट्या-वरोवंट्याचाच वापर होताना दिसतो.

टाकीचे घाव देतो दगडाला आकार अन् जीवनाचा आधार
नसिम शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : टाकीचे घाव सोसल्यास म्हणतात की, दगडाला पण देवपण येते. पण हाच दगड पिढ्यान्पिढ्यांपासून त्या दगडावर घाव घालणा-या अनेकांना जीवनाचा आधार बनला आहे. कधी देवाच्या रुपात, तर कधी पाटा-वरवंटा किंवा जात्याच्या रूपात पाथरवट दगडाला आकार देत असतो. आजच्या आधुनिक काळात पाटा-वरवंटा अन् जात्याची जागा मिक्सर आणि गिरणीने घेतली असली तरी आजही ग्रामीण भागात प्रत्येक घरी पाट्या-वरोवंट्याचाच वापर होताना दिसतो. म्हणून आजच्या काळातही हेच दगड अनेकांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे.
जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथे सडकेच्या कडेलाच दगडावर टाकीचे घाव घालणारे बावणे पांगरी येथील मुकूंद धोत्रे यांनी आजही आपल्या पूर्वजांचा हा व्यवसाय जपला आहे. डोणगाव येथे खदानीचा मजबूत दगड मुबलक प्रमाणात असल्याने धोत्रे हे तेथेच दगडाला आकार देतात. तयार झालेला माल ते गाडीत टाकून थेट नाशिक जिल्ह्यात नेऊन विकतात.