Scholarship allocation to 23 thousand students | २३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप
२३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली. यामुळे बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीची रक्कम लाटणाऱ्यांना लगाम लागला आहे.
अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०१८ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील १२ हजार ७७ विद्यार्थ्यांनी शासनाच्या महाडीबीटी आॅनलाईन पोर्टलवर नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांची कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर त्यापैकी ९ हजार ९१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले होते. त्यापैकी ८ हजार ३६४ विद्यार्थ्यांना १० कोटी ३५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तर इतर मागास प्रवर्गातील १४ हजार ८१६ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ९३९ विद्यार्थ्यांना १२ कोटी ६५ लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. अनेक महाविद्यालये बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्तीची रकमेचा अपहार करत होती. यामुळे गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ होत नव्हता. तसेच शासनाच्या तिजोरीवर सुध्दा मोठा भार पडायचा. शिष्यवृत्ती वाटपात सुध्दा पारदर्शकता नव्हती. यामुळे राज्य शासनाने शैक्षणिकवर्ष २०१८ पासून महाडीबीटी आॅनलाईन पोर्टल सुरु केले आहे.
या पोर्टलवर विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करावा लागतो. आधारकार्डसह विविध शैक्षणिक तसेच महाविद्यालयाची माहिती भरावी लागते.
आॅनलाईन अर्जामुळे बोगसगिरीला आळा बसला असून पात्र लाभार्थ्यांना याचा चांगला लाभ होत आहे. तसेच विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची फीस, तसेच इतर शुल्क महाविद्यालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
सुरुवातील या महाडिबीटी पोर्टवर आॅनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक वेळा साईड हळू चालत असल्याने विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज करण्यात अडचणी आल्या होत्या. यामुळे विद्यार्थी, पालकांनी संताप व्यक्त केला होता.
यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी चारवेळेस मुदत वाढ दिली होती. ९ जुलै पर्यंत महाविद्यालयांनी मंजूर केलेल्या १६०० विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे आॅनलाईन पाठविण्यात आलेले आहे.
लवकरच सुरु होणार महाडीबीटी पोर्टल
शैक्षणिक वर्ष २०१९- २०२० यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी महाडिबीटी पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.


Web Title: Scholarship allocation to 23 thousand students
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.