Santosh Danve as BJP's district president | भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष दानवे

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष दानवे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांची आगामी तीन वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
भाजपच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर शितोळे, मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, डॉ.भागवत कराड, आ. कुचे, शहराध्यक्ष राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी मुख्य सूचक म्हणून आमदार संतोष दानवे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. त्याला अंबडचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर आणि भीमराव भुजंग यांनी अनमोदन दिले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दानवे म्हणाले, आगामी काळात आपण भाजप संपूर्ण जिल्हाभर कसा नेता येईल, यासाठी सर्वांच्या मदतीने प्रयत्न करू. केंद्रातील सरकार जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देत आहे. असे असतानाच विरोधकांकडून नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावरून चुकीचा समज समाजात पसरवत आहेत. हे खोडून काढणे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भागवत कराड यांनीही संतोष दानवे हे तरूण असल्याने त्यांच्याकडून पक्षवाढीसाठी मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, आगामी काळात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचे सदस्य जास्तीत जास्त कसे निवडून येतील, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त करतानाच आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिघे एकत्रित असून, आपण मात्र,राजकीय मैदानात एकटे आहोत, हे लक्षात घ्यावे.

Web Title: Santosh Danve as BJP's district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.