परतूर तालुक्यात वाळूचा उपसा सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:58 IST2019-01-29T00:58:16+5:302019-01-29T00:58:49+5:30
दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून, यामुळे नदी पात्राची चाळणी झाली आहे.

परतूर तालुक्यात वाळूचा उपसा सुरुच
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर: तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून, यामुळे नदी पात्राची चाळणी झाली आहे. यामुळे पात्राची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता घटली असून, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
परतूर तालुक्याला गोदावरी व दुधना या नद्यांचे पात्र लाभले आहे. या दोन्ही नदीच्या पात्रातून सातत्याने वाळू उपसा होत असतो. या पात्रातील वाळू घाटाचे लिलाव दरवर्षी लांबणीवर पडतात. याचा लिलाव हो या ना हो मात्र, वाळू उपसा सुरुच असतो. या पात्रातील वाळू मराठवाड्यात जाते. मागील काही दिवसांपासून निम्न दुधनाचे बॅक वॉटर खाली गेल्याने वडगाव वाळपट्टा उघडा पडला आहे. या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ‘फ्रेश’ वाळूचे घबाड या माफियांना सापडले आहे.
वडगाव पट्ट्याजवळ परतूर शहराला चाळीस वर्षापासून पाणीपुरवठा करणारी योजना होती. पाडळी येथून शुध्द पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे. यावर्षी अल्प पावसाने धरणातील पाणी पातळी फारशी वाढली नाही. व आहे ते पाणी झपाट्याने घटू लागले आहे. मागील दोन महिन्यापासून बॅक वॉटर खाली गेल्याने वडगाव पाणीपुरवठा योजनेजवळील वाळू पट्टा पुर्ण उघडा पडला आहे. याचा फायदा घेऊन येथे दररोज मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचा उपसा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर वापरले जात असून, रात्र दिवस मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे.
या वाहनांना जाण्यासाठी वाळू माफियांनी रक्कम खर्च करुन जेसीबीने रस्ता तयार केला आहे. या बेसूमार वाळू उपशामुळे दुधना नदीच्या पात्राची पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटली आहे.
रात्रभर ही वाहने धडधड करीत सुसाट वेगाने धावत असल्याने या मार्गावरील रहिवाशांची झोपही उडाली आहे. याबरोबरच वाहनांमुळे रोडवरील खडी पूर्णपणे उघडी पडून रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. तरी या वाळू पट्ट्याचा रीतसर लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.