चोरीच्या दुचाकींची कर्जाचे हप्ते थकलेल्या सांगून विक्री; पाच आरोपींना अटक, चौदा दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 15:19 IST2021-04-02T15:18:48+5:302021-04-02T15:19:11+5:30
बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून साथीदारांच्या मदतीने चौदा दुचाकी चोरल्याचे आरोपींनी सांगितले.

चोरीच्या दुचाकींची कर्जाचे हप्ते थकलेल्या सांगून विक्री; पाच आरोपींना अटक, चौदा दुचाकी जप्त
पारध (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद केली आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
भोकरदन तालुक्यातील शेखर ऊर्फ अण्णा प्रकाश दांडगे (रा. पिंपळगाव रेणुकाई), विलास रामभाऊ कुऱ्हाडे (रा. हिसोडा), श्रीराम ऊर्फ बंडू शैलेंद्र जोनवाल (रा. लेहा), तेजराव ऊर्फ बाबा रामदास जाधव (रा. पिंपळगाव रेणुकाई) आणि गजानन फकिरचंद गोठवाल (रा. जळगाव सपकाळ) या सर्व आरोपींना दुचाकी चोरी प्रकरणात औरंगाबाद विशेष गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरलेल्या चौदा दुचाकींपैकी नऊ गाड्यांना नंबरप्लेट नाही. या चोरट्यांना २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान ताब्यात घेतले असून, २० मार्च रोजी या पाचही आरोपींविरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत चोरून विक्री केलेल्या दुचाकी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, पोलीस नाईक बी. एम. चौधरी, प्रकाश सिनकर, प्रदीप सरडे, सागर देवकर, शिवाजी जाधव, विकास जाधव, सुरेश पडोळ, दिनेश पायघन, नागरे, वाघ, खरात, रानगोते, भालके, टेकाळे, खेडेकर, महिला पोलीस अंमलदार रिठ्ठे यांच्या तपास पथकाने केली.
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या म्हणून करायचे विक्री
पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी या आरोपींची चौकशी केली असता, पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीसह लगतच्या बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून साथीदारांच्या मदतीने चौदा दुचाकी चोरल्याचे आरोपींनी सांगितले. या गाड्या बँकेने ओढून आणलेल्या आहेत, त्या आम्ही कमी किमतीत देतो आणि गाड्यांचे कागदपत्र नंतर आणून देतो, असे खोटे बोलून खेड्यापाड्यातील लोकांना गाड्यांची विक्री करायचे.