एस. टी.च्या ५६ बसेसनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:19+5:302021-02-13T04:29:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : एस. टी.चा प्रवास हा सुखाचा प्रवास असल्याने बहुतांश प्रवासी बसनेच प्रवास करतात. ...

एस. टी.च्या ५६ बसेसनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एस. टी.चा प्रवास हा सुखाचा प्रवास असल्याने बहुतांश प्रवासी बसनेच प्रवास करतात. परंतु, मागील वर्षभरात जिल्ह्यात ५६ बसेसने प्रवाशांची साथ अर्ध्या रस्त्यात सोडली असल्याचे समोर आले आहे. स्प्रिंग तुटणे, टायर पंक्चर होणे, अपघात होणे आदी कारणांमुळे या बस खराब झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हयात राज्य परिवहन महामंडळाची चार आगार आहेत. या आगारांमधील २५२ बसेस प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी २४ तास रस्त्यावर धावतात. एस. टी. महामंडळाकडूनही तसे नियोजन केले जाते. त्यामुळेच बहुतांश प्रवाशी बसने प्रवास करतात. परंतु, काही बसेस स्प्रिंग तुटणे, टायर पंक्चर होणे, स्टार्टमध्ये बिघाड, इंजिन बंद पडणे आदी कारणांमुळे रस्त्यातच बंद पडतात. किरकोळ बिघाड असेल तर चालक, वाहक दुरूस्त करतात. परंतु, मोठा बिघाड असल्यास तत्काळ ब्रेकडाऊन व्हॅनला बोलावले जाते. अवघ्या काही तासात ही व्हॅन तेथे पोहोचते. वाहक व चालक प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळते.
दहा वर्षांवरील ८० बसेस
जालना येथील राज्य परिवहन महामंडळ विभागाकडे २५२ बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस दहा वर्षांवरील आहेत. लवकरच या बसेस भंगारात जाणार आहेत. ही कारवाई विभागीय यंत्र अभियंत्यांमार्फत केली जाणार आहे.
रस्त्यात एस. टी. बंद पडण्याची कारणे
रस्त्यात एस. टी. बंद पडण्याची अनेक कारणे आहेत. यात स्प्रिंग तुटणे, टायर पंक्चर होणे, इंजिन बंद पडणे, स्टार्टमध्ये बिघाड होणे, एअर लॉक होणे, अपघात होणे आदी कारणांमुळे बसमध्ये बिघाड होतो.
वर्षाला १ कोटी रूपये एस. टी. मेंटेनन्सला
बिघाड झालेल्या बसेस दुरूस्त करणे, त्यांची नियमित देखभाल करणे यासाठी राज्य परिवहन महामंडळाला वर्षाला तब्बल १ कोटी रूपये खर्च येतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाते. बस आगाराच्या बाहेर पडण्यापूर्वी एका तंत्रज्ञाकडून बसची तपासणी केली जाते. बसचालकही एस. टी.ची तपासणी करतात.
जालना जिल्ह्यात गत वर्षभरात ५६ बसेस रस्त्यातच बंद पडल्या होत्या. यात स्प्रिंग तुटणे, टायर पंक्चर होणे, अपघात होणे, स्टार्टमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे बस बंद पडल्या होत्या. बस बंद पडल्यास तत्काळ ब्रेकडाऊन व्हॅन पाठवली जाते.
प्रदीप नेहुळ, विभागीय वाहतूक नियंत्रक, एस. टी.
एकूण बस २५२
आगारनिहाय बसची संख्या
आगाराचे नाव बसची संख्या बंद पडलेल्या बसची संख्या
अंबड ६४ ८
जालना ८५ १९
परतूर ५० १२
जाफराबाद ३३ १७