शहर वाहतुकीसाठी रोडमॅप तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:23 IST2018-06-26T01:22:50+5:302018-06-26T01:23:37+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे

शहर वाहतुकीसाठी रोडमॅप तयार करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे. गेल्या दोन दिवसात ४२ वाहनधारकांकडून १० हजार २०० रूपयांचा दंड वसूल केल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील नवीन आणि जुना जालना भागातील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची आपण माहिती घेतली आहे. त्यात विशेष करून शाळा, महाविद्यालये भरताना आणि सुटताना ही वाहतुकीची कोंडी जास्त होते.
यावर उपाय म्हणून शहरातील प्रमुख शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेणार असून, त्यात शाळा सोडताना टप्प्याने वर्ग सोडल्यास वाहतुकीवर त्याचा ताण येणार नसल्याचे ते म्हणाले.
तसेच शहरातील एकेरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची भेट घेऊन अतिक्रमण तसेच पार्किंगसाठी जागा देण्या बाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
पाणीवेस परिसरासह मामा चौक, नरीमान रोड, टांगा स्टँड, शिवाजी पुतळा परिसरातीलही वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.