मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड शंभर टक्के तपासले जातील: एकनाथ शिंदे
By विजय मुंडे | Updated: January 2, 2024 20:14 IST2024-01-02T20:11:21+5:302024-01-02T20:14:44+5:30
२० जानेवारीपर्यंत आरक्षण द्या, आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही : जरांगे पाटील

मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड शंभर टक्के तपासले जातील: एकनाथ शिंदे
जालना : मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. हैदराबाद, तेलंगणा येथील कागदपत्रांची तपासणीही केली जाणार आहे. क्युरेटिव पिटीशनवर २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार असून, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधताना दिली. सगे-सोयरे शब्दाचा समावेश करून आरक्षणाचा जीआर काढा, सापडलेल्या नोंदीचा आधार घेवून २० जानेवारीपर्यंत आरक्षण द्या, आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आ. बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी सायंकाळी व्हीसीद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आ. बच्चू कडू यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शिवाय प्रत्येक अधिकाऱ्यांनी समितीला सहकार्य करावे, नोंदी शोधाव्यात याबाबत सक्त सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जरांगे पाटील यांनीही आपली भूमिका मांडली. उपोषण सोडताना जे शब्द सांगितले होते त्या चारही शब्दांचा जीआरमध्ये समावेश करावा. ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार, ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक, ज्याची नोंद सापडले त्याचे सगे सोयरे, मागेल त्याला आरक्षण द्यायचे हे शब्द टाकून आरक्षणाचा जीआर काढावा. त्र्यंबकेश्वरपासून काळाराम मंदिरापर्यंत, राजस्थानचे भाट, शाळेच्या दाखल्यांवर ज्या कुणबी नोंदी आहेत त्या घ्याव्यात. ३३/३४ नमुन्यानुसार, १४ नुसार रेकॉर्डची तपासणी करावी. ओबीसीच्या ८३ व्या क्रमांकावर कुणबी, मराठा एकच आहे. तत्सम मराठा म्हणून आरक्षणाचा जीआर काढा. हैदराबाद, सातारा संस्था, मुंबई गव्हर्मेंटच्या कागदपत्रांचा आधार घेता येईल असे सांगत २० जानेवारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील यांच्यासह अंतरवाली सराटीतील एकाचीही नोंद नाही
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याची नोंद सापडली नसल्याचे समोर आले आहे. शिवाय ज्या अंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरू आहे त्या गावातील एकाचीही कुणबी नोंद सापडलेली नाही. यापूर्वी आंदोलन केलेल्या साष्टपिंपळगाव, वडीकाळ्या, भांबेरी येथेही कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत. असे असले तरी गरजू मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण हा लढा उभारला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.