रेशीम कोषास विक्रमी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:59+5:302021-09-03T04:30:59+5:30
जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या रेशीम मार्केटमध्ये गुरुवारी रेशीम कोषास चालू हंगामातील सर्वांत विक्रमी ...

रेशीम कोषास विक्रमी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव
जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या रेशीम मार्केटमध्ये गुरुवारी रेशीम कोषास चालू हंगामातील सर्वांत विक्रमी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. विक्रमी भाव मिळाल्याबद्दल संबंधित शेतकऱ्यासह खरेदीदाराचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी मराठवाड्यासोबतच विदर्भ, खान्देश आणि अहमदनगर जिल्ह्यांतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्यात सर्वप्रथम जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २१ एप्रिल २०१८ रोजी स्वतंत्र रेशीम कोष मार्केट कार्यान्वित केले. चालू वर्षात आजपर्यंत १४७१ शेतकऱ्यांनी १३९ टन रेशीम कोष विक्री केली असून ४ कोटी ९७ लाख रुपये एवढी रक्कम रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. गतवर्षी ऑगस्टअखेर २१० रुपये प्रतिकिलो दर होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून सरासरी ३६५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. तर आज धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील शेतकरी सोमीनाथ कणसे यांच्या कोषास देशातील क्रमांक १ ची बाजारपेठ असलेल्या रामनगर ( कर्नाटक) च्या तोडीस विक्रमी असा ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शेतकरी कणसे यांच्यासह खरेदीदार इम्रान पठाण यांचा बाजार समितीतर्फे संचालक विष्णू चंद, सचिव रजनीकांत इंगळे, रेशीम अधिकारी अजय मोहिते यांनी सत्कार केला. यावेळी मोहन राठोड, अशोक कोल्हे, राहुल तायडे, गजानन जऱ्हाड आदींची उपस्थिती होती.
चौकट
सोन्याच्या तोडीस रेशीम कोषाला दर
कोष लागवडीकडे वळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण मराठवाड्यात प्रथम जालना बाजारपेठेत रेशीम मार्केट सुरू केले. या मार्केटमध्ये रेशीम कोषाला सोन्याच्या तोडीचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फलित होत असल्याचा आनंद असल्याचे माजी मंत्री तथा बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी सांगितले, तसेच कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपले कोष बाजारपेठेत विक्री करावेत, असे आवाहनही टोपे यांनी केले.