लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची पुणे महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मुंबई येथील अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक डॉ. विजय राठोड यांची नूतन जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.
जून २०१८ मध्ये रवींद्र बिनवडे हे जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते. तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे ते काही मोजक्या जिल्हाधिकाऱ्यांपैकी ठरले आहेत. या तीन वर्षांच्या काळात त्यांनी पीककर्ज वाटप तसेच कोरोना काळामध्ये सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीसह कोविड केअर हॉस्पिटलची उभारणी केली. यासह प्रशासकीय कामकाजामध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणली होती.
रुजू झाल्यानंतर बिनवडे आणि तत्कालिन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी वाळू माफियांविरुद्ध कंबर कसली होती. यासह अनेक शासकीय उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी बिनवडे यांनी प्रयत्न केले. नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील असून, ते २०१४ चे आयएएस बॅचचे आहेत. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉ. राठोड यांनी स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली.
प्रारंभी गडचिरोली येथील जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यानंतर मीराभाईंदर महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले. सध्या ते मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागात कार्यरत होते.