रावसाहेब दानवे वॉचमनच्या मुलाच्या लग्नानिमित्त 'शेफ' बनले; पाहुण्यांना पोहे बनवून वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:19 IST2025-03-25T19:18:58+5:302025-03-25T19:19:49+5:30
घरचे लग्न असल्यासारखे रावसाहेब दानवे यांनी सर्वसूत्रे घेतली हाती. पोहे बनवले आणि पाहुण्यांना वाढले देखील.

रावसाहेब दानवे वॉचमनच्या मुलाच्या लग्नानिमित्त 'शेफ' बनले; पाहुण्यांना पोहे बनवून वाढले
- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना) : बंगल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या मुलाच्या विवाह असल्याने माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे थेट फत्तेपुर गावात आज सकाळीच ( दि. २५) ८ वाजता पोहचले. यावेळी रितीनुसार मांडव टाकण्यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी खास पोहे तयार केले. विशेष म्हणजे, घरचे लग्न असल्यासारखे दानवे यांनी पोहे पाहुण्यांना वाढले देखील. यामुळे दानवे यांच्या साधेपणाची पुन्हा प्रचिती येऊन मांडवात याचीच चर्चा रंगली होती.
माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या बंगल्यावर समाधान गायकवाड ( रा. फत्तेपुर ता भोकरदन) हे गेल्या २५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आज त्यांचा मुलगा दिपक गायकवाड याचा दहीगाव ( ता भोकरदन) येथील कविता शेणफड कानडजे हीच्यासोबत विवाह होता. त्या निमित्ताने गायकवाड यांच्या फत्तेपुर येथील घरी रितीनुसार मांडव टाकण्याचा कार्यक्रम आज सकाळी सुरू होता. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मॉर्निग वॉकवरून थेट फत्तेपूर येथे दाखल झाले. नवरदेव आणि गायकवाड कुटुंबियांची विचारपूस केल्यानंतर माजी मंत्री दानवे यांनी सर्व सूत्र हाती घेत मांडव टाकण्याच्या कार्यक्रमात उपस्थितीत पाहुण्यांसाठी पोहे तयार करण्यास घेतले. इतकेच नाही तर दानवे यांनी पाहुण्यांना पोहे वाटप करून स्वतः देखील त्यावर ताव मारला.
खूप आनंदाचा क्षण
यावेळी वरपिता समाधान गायकवाड म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून माजी मंत्री दानवे यांच्या घरी काम करतो. त्यांनी आणि संपूर्ण दानवे कुटुंबाने मला कायम घरातल्या व्यक्तीप्रमाणे वागणूक दिली. आज देखील माजी मंत्री दानवे यांनी माझ्या घरी सकाळीच उपस्थित राहिले. नवरदेव, माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण परिवारासाठी हा क्षण खूप आनंदाचा आहे.