जालना जिल्ह्यात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये रंगतोेय खो-खो चा खेळ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:04 IST2019-12-10T01:04:18+5:302019-12-10T01:04:33+5:30
जालना जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत चोऱ्या. घरफोड्या तसेच खून, गोळीबाराचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने जालन्यातील पोलिसांची जरब संपली काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे

जालना जिल्ह्यात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये रंगतोेय खो-खो चा खेळ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत चोऱ्या. घरफोड्या तसेच खून, गोळीबाराचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने जालन्यातील पोलिसांची जरब संपली काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे गुन्हे घडत असतांनाच पोलिस त्या प्रकरणातील आरोपींना अटक करत आहेत. त्यांच्याकडून पोलिसी खाक्या दाखवून दुसरे गुन्हेही उघडकीस आणत आहेत. परंतु चोºया, लूटमारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. अनेक मोठ्या चोऱ्यांचा तपास आजही लागलेला नसल्याचे वास्तवही नाकारून चालणार नाही. त्यामुळे जालन्यात चोर आणि पोलिसांमध्ये जणू काही एकमेकांना खो देण्याचा खेळ रंगत असल्याचे चित्र आहे.
जालन्यात व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे हवालाच्या माध्यमातून होणारी देवाण-घेवाणही काही कोटींमध्येच असते. यातून व्यावसायिकांमधील स्पर्धा आणि एकमेकांविरूध्द असलेला रोष यातून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. तीन महिन्यापूर्वी शेलगाव येथे एका तरूणाचा गोळी घालून सायंकाळी खून करण्यात आला होता. त्यातील मुख्य आरोपीं पर्यत पोलीस पोहोचू शकले नाहीत. दरम्यान या खुनाची घटना शांत होते ना तोच व्यापारी सिंघवी यांच्यावर गोळीबार होतो, त्यातून ते बालंबाल बचावतात. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनच गौतम मुनोत यांना जिवे मारण्यासाठी दिलेल्या सुपारीचे प्रकरण समोर आले. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दलाने चांगली कामगिरी करून गावठी पिस्तूल तसेच काडतूस जप्त केले.
हे सर्व होत असतानाच गुन्हे घडण्याचे प्रमाणमात्र पोलसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सदर बाजार पोलिस ठाण्याजवळील भरत पाटणी यांच्या घरी चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास जैसे थे आहे. हा तपास लावण्यासाठी पोलिसांकडून पाहिजे तसे प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी बुलडाणा पतसंस्थेतील कर्मचा-यांना मारहाण करून त्यांच्याकडील ३ लाख रूपये लुटण्याची घटना ही भर दिवसा घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच अवैध वाळूचे आव्हानही पोलीस आणि महसूल समोर निर्माण झालेले आहे.
जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक एस.चैतन्य हे एक धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जात असतानाच त्यांच्याच काळात गुन्हे घडण्याचे प्रकारही वाढत आहेत. गुन्हे ज्या प्रमाणे वाढत आहेत ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.
गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण हे कागदावर सुरळीत असल्याचे दर्शविले जात असतानाच प्रत्यक्षात मात्र वेगळी स्थिती आहे. लहानमोठे भांडण ही तर जालन्यात नित्याचीच बाब झाली आहे.
गस्त वाढवूनही गुन्ह्यांमध्ये वाढ कशी ?
पोलिसांकडून शहर व जिल्ह्यात गस्त वाढवून गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आज जालना शहरासह ग्रामीण भागात चो-या, दरोड्यांचे प्रमाण कायम आहे.
त्यामुळे गस्तीवर असलेले पोलिस कुठे कमी पडतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यातच पोलिसांकडील खब-यांचे जाळ कमी झाल्यानेही गुन्हेगारांची टीप मिळतांना यंत्रणेसमोर अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.