जोरदार पावसामुळे रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:08+5:302021-09-04T04:36:08+5:30

आलापूर येथे रस्त्यावर अतिक्रमण भोकरदन : तालुक्यातील आलापूर येथील रामेश्वर मंदिर ते वाडी रोडवर अतिक्रमण करून आरसीसी ...

Potholes on roads due to heavy rains | जोरदार पावसामुळे रस्त्यावर खड्डे

जोरदार पावसामुळे रस्त्यावर खड्डे

आलापूर येथे रस्त्यावर अतिक्रमण

भोकरदन : तालुक्यातील आलापूर येथील रामेश्वर मंदिर ते वाडी रोडवर अतिक्रमण करून आरसीसी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हे बांधकाम तत्काळ बंद करावे, अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा गणेश तळेकर यांनी दिला आहे.

मोसंबीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोसंबीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळगळतीचे प्रमाण वाढले आहे. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. कुंभार पिंपळगावसह परिसरात मोसंबी, डाळींब, केळीची मोठ्या प्रमाणात लागवड असून, यात चांगली वाढ होत आहे. सिंचनाची सोय असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही होत आहे. यामुळे कुंभार पिंपळगावसह परिसरातील बळीराजा फळबाग लागवड करायची म्हटले, की पहिली पसंती मोसंबीला देतात.

सूचना फलक गायब, चालकांची गैरसोय

अंबड : तालुक्याचे ठिकाण असलेल्या अंबड शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात या रस्त्यांवरील सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाने गरजेनुसार सूचना, दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

लांडग्यांनी पाडला आठ शेळ्यांचा फडशा

धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील बंगसीवाडी भागातील शेख मुस्तू शेख सालेभाई यांच्या शेतातील छपरात बांधलेल्या १२ शेळ्यांवर ५ लांडग्यांनी बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हल्ला करून आठ शेळ्यांना ठार केले, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. एक लहान बकरू पळाल्याने त्याचा जीव वाचला.

जाफराबाद रस्त्यावर जनावरांचा ठिय्या

जाफराबाद : शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे दिवस-रात्र ठिय्या मांडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जाफराबाद शहरातील नगरपंचायतीचा कोंडवाडा शोभेची वस्तू बनला आहे. मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो. अनेकदा ठिकठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे.

सपाटे कुटुंबीयांना विम्याचा धनादेश

बदनापूर : तालुक्यातील चिखली येथील मृत दिलीप गंगाधर सपाटे यांच्या पत्नी वैशाली सपाटे यांना विम्याचा ५० हजार ९४७ रुपयांचा धनादेश जिल्हा परिषद सदस्या द्वारकाबाई डोळस यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सरपंच मेनका सोनवणे, वंदना भोंडे, मंदा जोशी, सविता वखरे, जगन्नाथ डोळस, सुखदेव शेवाळे, बाबासाहेब देशमुख, विष्णू सोलाट, लक्ष्मण पिसाळ, संजय देशमुख, नंदू देशमुख, मच्छिंद्र जोशी आदींची उपस्थिती होती.

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

जालना : तालुक्यातील जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Potholes on roads due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.