शास्त्री महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:31+5:302020-12-26T04:24:31+5:30
वाहनधारकांची गैरसोय : रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी परतूर : परतूर शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ...

शास्त्री महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
वाहनधारकांची गैरसोय : रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी
परतूर : परतूर शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
परतूर शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनाधारकांची मोठी गर्दी असते. परंतु, मागील काही वर्षांपासून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणेही अवघड झाले आहे.
या रस्त्याची दोन वेळा दुरूस्ती करण्यात आली आहे. परंतु, काही दिवसांतच रस्त्याची जैसे थे परिस्थिती झाली. शहरातील रेल्वेगेट वरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक या रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे. अवजड वाहनेही रस्त्याने ये-जा करीत असल्याने रस्त्यावरील खडी उखडत आहे. काही ठिकाणी धुळीचे लोटही उडत असल्याने पादचारीही त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
फोटो
परतूर शहरातील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. शुक्रवारी रस्त्यावरून ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर खड्ड्यात फसला होता.